Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सर्व शिक्षक बंधू भगिनींचे माझ्या नवीन ब्लॉग वर हार्दिक हार्दिक स्वागत.

Tuesday, 9 February 2016

सहलीसाठी आता नवीन नियमावली

सहलीसाठी आता नवीन नियमावली.


पुणे - शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयांच्या सहलीदरम्यान शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास त्यास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य वा मुख्याध्यापक आणि सहलीसबरोबर असणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभागामार्फत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
आबेदा इनामदार महाविद्यालयातील चौदा विद्यार्थ्यांना मुरूड जंजिरा येथे जीव गमवावा लागला. अशा घटना घडू नयेत म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. सहलींसाठी त्याचे पालन करणे प्रत्येक शाळेवर आता बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेळसांड झाल्यास, त्यांना शारीरिक वा मानसिक त्रास झाल्याची तक्रार पालकांनी केली, तर त्यास जबाबदार शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
सहलींसाठी नियमावली
- 🗻समुद्र किनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत.

-👤 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे.

-🚑 सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत.

- 👥सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोचवावा. त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. गरज भासल्यास सहलीबरोबर पालकांचा एक प्रतिनिधी पाठवावा.

-📃 सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सहलीच्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे.

- 🚌सहलींसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या बस वापराव्यात.

- 🚶दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सहलीबरोबर पाठवावा. सहलीला आलेल्या विद्यार्थिनींना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये.

-🍷🚬 शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.

- 📲सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत मोबाईल फोन वापरण्याची मुभा द्यावी. त्यांना पालकांच्या संपर्कात राहण्याची सूचना द्यावी.

- 🏂🏊माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडा इत्यादीसाठी परवानगी देऊ नये.

-😏 विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती कोणत्याही संस्थेने करू नये.

- 💶शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी वा जादा शुल्क गोळा करू नये

- 🌅शैक्षणिक सहलीच्या मुक्कामाचा कालावधी हा एक मुक्कामापेक्षा अधिक काळ असू नये.

-✈ राज्याबाहेर सहल काढण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणार नाही.

- 👨सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सहलीतील सर्व शिक्षकांची असेल.

- 👩🏼सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल, तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर नेणे बंधनकारक राहील.

-☝ विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- 🚶सहलीत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळेने निश्चित केलेला पालक प्रतिनिधी या शिवाय अन्य कुणीही बाहेरची व्यक्त घेऊ नये.

-📝 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. सहलीच्या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळवाव्यात.

-🗻 प्राथमिक शाळेच्या सहली या परिसर भेट वा संध्याकाळी परत घरी येतील, अशा स्वरूपाच्या असाव्यात. रात्रीच्या वेळी प्रवास करू नये.

- 🏂🏄साहसी खेळ, वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढू नयेत.

🚂🚌🚌🚌🚌
- रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी, रेल्वेचे फाटक नसलेल्या ठिकाणी रेल्वे पुढे गेल्याची खात्री वा रेल्वे येत नसल्याची खात्री करूनच बस पुढे न्यावी.

- 👴👧🏻👨शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे संबंधित पदाधिकारी या सर्वांवर नियमानुसार गरज भासल्यास कायदेशीर कारवाई, शिस्तभंगाची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.

- 🙈विद्यार्थ्यांची हेळसांड, कुचंबना झाल्यास मानसिक, शारीरिक त्रास झाल्यास त्याची पालकांकडून तक्रार आल्यास जबाबदार शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

- 📋शाळांनी या सर्व सूचनांचे पालन केले आहे का, याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी आणि तसेच त्यासंबंधी शंभर रुपयांच्या स्टॅंपवर हमीपत्र घेऊनच सहलींसाठी परवानगी द्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाईल.

☝वरील सुचनांचे काटेकोर पालण करुणच सहलीचे आयोजन करा

Monday, 8 February 2016

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश.



जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाचीसोमवार, ०९ फेब्रुवारी, २०१५

कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यातील ग्रामीण भागात 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्वशालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारे सर्व 19 वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळी देण्याचा कार्यक्रम ठाणे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपुर, गडचिरोली हे जिल्हे वगळता इतर जिल्हयातील ग्रामीण भागात होणार आहे. याविषयी आपण जाणून घेऊया...

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 24 कोटी 10 लाख (68 टक्के) बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. जगात 28 टक्के बालकांना असा कृमीदोष होण्याची शक्यता असते.

जंत होण्याची प्रमुख कारण...
•  वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे.
•  या कृमीदोषांचा संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो.
•  बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना अशक्त (कमजोर)करणारा आहे.
•  कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण देखील ठरते.

भारतात 6 ते 59 महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येक 10 बालकामागे 7 बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो व ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्तही असू शकते. तसेच 15 ते 19 वर्षे वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलीमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. भारतामध्ये 5 वर्षांखालील जवळजवळ 50 टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे आणि साधारणतः 43 टक्के बालके कमी वजनाची आहेत. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देवू शकत नाहीत. शाळेतही उपस्थित राहू शकत नसल्याने याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश...
01 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्वशालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारे सर्व 19 वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राज्य व जिल्हास्तरावर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेसाठी पथके स्थापन करुन 10 फेब्रुवारी 2015 रोजी जंतनाशक दिन व 13 फेब्रुवारी 2015 रोजी मॉप-अप राऊंड दिन यादिवशी शाळा व अंगणवाडी केंद्राना आरोग्य विभागामार्फत भेटी देण्यात येणार आहेत.

1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुले-मुली, सर्व शासकीय शाळा/ शासकीय अनुदानित शाळा/ अंगणवाडी केंद्र/ आश्रमशाळा/ खाजगी शाळा स्वेच्छेने या मोहिमेअंतर्गत लाभ घेण्यास तयार असतील तर उपलब्ध जंतनाशक गोळी साठ्याप्रमाणे त्या शाळेतील लाभार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग व शिक्षण विभागाचा सहभाग आहे.

गोळी देण्याची पद्धत...
•  वयोगटानुसार जंतनाशक (अॅल्बेन्डझोल 400 मिलीग्रॅम) गोळी 1ते 2 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अर्ध्या गोळीची मात्रा देण्यात येते.
•  ही मुले गोळी गिळू शकत नाहीत म्हणून अशा मुलांना या गोळीची पावडर करुन (दोन चमच्यामध्ये गोळी दाबून पावडर करावी) पाण्यासोबत द्यावी.
•  तसेच 2 ते 19 वर्षे वयोगटातील मुला- मुलींना एका गोळीची मात्रा देण्यात यावी.
•  ही गोळी बालकांनी चावून खावी व त्यावर शुद्ध पिण्याचे पाणी प्यावे.
•  शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्रावर केलेली असते.
•  शाळेत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळांमधून जंतनाशक गोळी द्यावी. शाळेत, अंगणवाडी व उपकेंद्रात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
•  पाच वर्षांखालील लाभार्थी शाळेत न जाणाऱ्या बालकांना व किशोर/किशोरींना (19 वर्षांपर्यंत) अंगणवाडी कार्यकर्तीने गोळी द्यावी.
•  आजारी असणाऱ्या बालक/ किशोर/किशोरी यांना जंतनाशक दिनी/मॉप-अप दिनी अॅल्बेन्डझोलची गोळी (जंतनाशक गोळी ) देवू नये.
•  तथापि, त्यांना ते पूर्णतः बरे झाल्यानंतर जंतनाशक गोळी वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावी.
•  जंतनाशक गोळी दिल्यानंतर लाभार्थ्यास/विद्यार्थ्यास दोन तास अंगणवाडीत/शाळेत थांबण्यास सांगावे.
•  जेणेकरुन काही संभाव्य विपरित परिणाम झाल्यास ताबडतोब काळजी घेणे सुलभ होईल.

जंतनाशक दिनाबाबतचे पर्यवेक्षण व सनियंत्रण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये एमडीएअंतर्गत (Lymphatic Filariasis Mass Drug Administration) मोहीम अंमलबजावणी झालेली आहे. ते जिल्हे वगळून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे.

मोहिमेची अंमलबजावणी होणारे जिल्हे...
सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी व अक्कलकोट तालुका व्यतिरिक्त इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिनाची अंमलबजावणी करण्यात येणार नाही.

आजचे बालक हे देशाचे भवितव्य असल्याने ते सुदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे. शासनाची राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम ही त्या दिशेने टाकलेले पाऊलच म्हणावे लागेल.